भारतातील पहिल्या दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दीचा संक्षिप्त इतिहास.

दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ११६ वर्षाच्या सेवेची वारसा लाभलेली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक होय. या बँकेचे अगदी आरंभीचे नाव दि अकोला सेंट्रल अर्बन बँक लि.,अकोला हे होते. सन १९०८ मध्ये अकोला जिल्हयातील १२ प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या १३ सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा. मि. हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि. ०५ फेबु्रवारी १९०९ रोजी बँक रजिस्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.

भारतामध्ये १९०४ साली सहकारी पतपेढयांचा कायदा पास झाल्यावर अकोला जिल्हयात सन १९०८-०९ पर्यंत वेगवेगळया प्रकारांच्या १३ सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या. सहकाराची तत्वे आणि सहकारी संस्थांचे महत्व लोकांना पटवुन देण्यासाठी सरकारने खास प्रचारक नेमले होते. लोकांची मने सहकाराला अनुकूल करण्याचे पुष्कळसे काम मा. के. पी. भट या अधिकाऱ्याने केले. शासनाकडून सहकारी चळवळीला चांगलेच उत्तेजन मिळत असे. अशा संस्था स्थापन करण्यात व त्यांना सफलता मिळवून देण्यात शासकिय अधिकारी तत्परतेने लक्ष घालीत असत.

अर्थात अकोला जिल्हयात ज्या १३ सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या, त्याचा परस्परांशी काही संबध नसे. त्या संस्थांची सभासद संख्याही पुष्कळ असल्याने त्यांना चालु गरजा भागविण्यासाठी लागणारा पैसा स्थानिक सावकारांकडून घ्यावा लागत असे. या संस्थांच्या कार्याचा व्याप जसजसा वाढू लागला तसतशी पैसे देणारी एखादी केंद्रीय पेढी असण्याची अधिकाधिक गरज भासू लागली. अशा केंद्रीय पेढीशी त्या सहकारी संस्था जोडून व तेथूनच सर्व संलग्न संस्थांना कर्ज पुरवठा व्हावा, असा त्या १३ सहकारी संस्थांचे चालक विचार करु लागले. त्याप्रमाणे विचार करणारे जिल्हयातील प्रमुख लोक सन १९०८ च्या जानेवारी महिन्यात एकत्र जमले व अकोला जिल्हयासाठी को-ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बारा प्रमुख लोकाच्या सहयांनी ही बँक को-ऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे रजिस्टर करण्यासाठी रीतसर अर्ज त्यांनी पाठवला. तो कायद्याप्रमाणे तपासल्यावर मंजूर करण्यात आला व त्या संबंधीचे अधिकृत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर लिहिल्या प्रमाणे ०५.०२.१९०९ रोजी रजिस्ट्रार साहेबांची सही होऊन अकोला को-ऑप. सेंट्रल बँक नोंदली गेली.

गेल्या ११६ वर्षाच्या कालखंडात बँकेच्या कारभारात पदाधिकारी बदलत गेल्यामुळे बदल घडून आला. सुरवातीला १९३० सालापर्यंत, ज्या मंडळींनी या बँकेची सुरुवात केली व तिला भक्कम पायावर आर्थिक दृष्टीने मजबूत केले तो एक कालखंड म्हणावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या कालखंडात जेव्हा आर्थिक मंदी देशात निर्माण झाली व विशेषत: शेतकरी वर्गात शेतीतून उत्पादन अती कमी झाल्यामुळे व शेतमालाचे भाव पडल्यामुळे आपले कर्ज परत करु शकण्यास असमर्थ ठरलेल्या लोकांच्या गहाण पडलेल्या अनेक जमिनी बँकेच्या मालकीच्या झाल्या.

आर्थिक मंदीमुळे १९३० ते ४० सालपर्यंतच्या कालावधीत बँकेचा आर्थिक कारभार जवळजवळ बंद होता, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बँकेजवळ असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी व बँकेचे भाग भांडवल कर्जाचे रूपाने फसल्यामुळे या काळात बँकेजवळ पैशाऐवजी शेतीच भरभक्कम गोळा झाली होती. परंतु १९४० ते १९४५ च्या कालावधीत बँकेने मोठया हिंमतीने व धीराने या संकटाला तोंड देऊन या आर्थिक अडचणीवर मात केली आणि जवळ असलेल्या सर्व जमिनी हळूहळू हप्तेवारीने किंवा संपूर्ण किंमत वसूल करून विकल्या. या १० वर्षाच्या काळात पिकांची परिस्थिती सुधारली. तसे शेतमालाचे भावही वाढले व त्यामुळे शेतकरी मंदीच्या लाटेतून सहीसलामत, सुखरूप बाहेर पडला. बँकेचा कारभार ज्या मंडळीच्या हातात होता ती बहुतांश शहरात राहणारी सुशिक्षित वर्गापैकी होती. बँक उत्तम चालावी, बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असावी, आर्थिक कायदयाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्ज द्यावे हीच त्यावेळची विचारप्रणाली होती.

शेतकऱ्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊन त्यांच्या खऱ्याखुऱ्या अडचणीचा अभ्यास करून त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मन:पूर्वक आस्था बाळगून काम करणारी मंडळी 1950 सालानंतर हळूहळू या बँकेच्या संचालक मंडळावर येऊ लागली व त्यांना पदाधिकारी बनण्याचाही योग प्राप्त झाला. म्हणून १९५० पासून तो आजतागायत बँकेची जी भरभराट व प्रगती एकदम झाल्यासारखी आपणांस दिसत आहे, त्याचेही मूळ व मुख्य कारण हेच आहे, असे म्हणावयास हरकत नाही. जे हाडाचे शेतकरी आहेत, ज्यांच्या आयुष्याचा बहुतांश काळ खेडयांमध्ये गेला आहे, ज्यांचे शेतकऱ्यांशी अती निकटचे संबंध आहेत अशा मंडळींनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षाकरिता काळजीपूर्वक कार्य केले नसते तरच नवल.

आरंभीचे नेतृत्व

सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे अधिकारी किंवा पुढारी कसे होते याचे वर्णन मेहकर येथील सहकार नेते कै. दादासाहेब सोमण यांनी विदर्भातील सहकारी चळवळी संबंधी काही विचार या शीर्षकाखाली महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या रौप्यमहोत्सवी स्मृतीग्रंथात (१९६४ साली ) पृ.१३७ वर लिहिले आहे की, सहकारी अधिकारी व त्यांच्या प्रेरणेने सामाजिक कार्य करणारे सुशिक्षित व काहीतरी समाजसेवा करावी अशा वृत्तीचे पांढरपेशा वर्गातील लोक ही सहकाराची चळवळ वऱ्हाड नागपूर प्रदेशात चालविण्यास पुढे आले. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, हा परोपकारी किंवा भावनिक विचार ही चळवळ सुरू करताना त्यांच्या मनात असला पाहिजे, असे त्या काळचे सहकार साहित्य, भाषणांचे रिपोर्ट किंवा वृत्तपत्रातील लेख वाचून वाटते. या काळात शहरातील सरकारी अधिकारी, काही व्यापारी, आणि कोर्टकचेऱ्यांतून सावकार विरूध्द शेतकरी असे अनेक खटले चालवून शेतकऱ्यांची ओळख झालेले नगरवासी वकील हे शेतकऱ्यांचा उध्दार करण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीचे नेते होते.

सन १९०४ ते १९३० हे पाव शतक, विदर्भातील सहकारी चळवळीचा बाल्यकाळ मानावा लागेल. या काळातील पालक सरकार होते आणि संस्थासंचालक पांढरपेशा शहरी संस्कृतीत वाढलेला कायदेपंडितांचा वर्ग होता. त्या काळातील खालील नावे वाचली तर वरील विधानाची सत्यता पटेल. विदर्भातील सहकारी चळवळीचे आद्य संस्थापक पहिले को.ऑप.रजिस्ट्रार मा. आर. एन. बॅनर्जी (त्रिवेदीनंतरचे को.रजिस्ट्रार) व मा. जी.एस.भालंजा (१९३७ पर्यंत असलेले को.रजिस्ट्रार ) इ. हे सर्व अधिकारी आय.सी.एस. होते. त्यांच्या दिमतीला रेव्हेन्यू खात्यातील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी असत. संस्थांची निर्मिती, नोंदणी व आर्थिक उभारणी पुष्कळअंशी शासकीय अधिकारीच करीत. आजच्या मानाने बोलावयाचे म्हणजे त्या काळातील सहकारी चळवळ ही जवळ जवळ सरकारी चळवळ होती तर मा. रावबहादूर दिगंबर, मा. रावबहादूर दामले, मा. रावबहादूर महाजनी या तत्कालीन महानुभावांनी मोठी कामगिरी नोंदविली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग व खेड्यातील बहुजन समाज यांना आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली व शेतकरी वर्गातून अनेक कायकर्ते सहकारी चळवळीत हिरिरीने पुढे आलेले आहेत. १९५१-५२ साली श्री. आनंदराव बरडे हे बँकेचे अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी मा. पुंडलिकराव पाटील धोतर्डीकर यांची निवड झाली व मा. ॲड. श्रीराम ह. मानकर हे मानद सचिव म्हणून काम पाहू लागले. १९५२-५३ ते १९५६-५७ या काळात मा. ॲड. श्रीराम ह. मानकर हे बँकेचे अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी मा. तुकाराम पाटील येडशीकर हे निवडून आलेत. मा. ॲड. निळकंठ श्रीधर उपाख्य नानासाहेब सपकाळ यांनी या काळात मानद सचिव पदाची जबाबदारी सांभाळली.

संयुक्त महाराष्ट्रातील बँकेची वाटचाल

विदर्भ विभाग मिळून मुंबई राज्याची १९६० साली निर्मिती झाली व यावेळेपासून सहकारी चळवळीला अकोला जिल्ह्यात विशेष गती मिळाली. ॲड. निळकंठ श्रीधर उर्फ नानासाहेब सपकाळ हे १९५९ साली बँकेच्या अध्यक्षपदी तर रामराव झनक हे उपाध्यक्षपदी निवडून आले. माजी आमदार शामराव देवराव धोत्रे हे मानद सचिव होते. तेव्हापासून बँकेची प्रगती अतिशय झपाटयाने होऊ लागली. शेतकऱ्यांना शेतीतून जास्त उत्पादन काढण्याची इर्षा निर्माण झाली व बँकेने आपली पत शेअर भांडवल व ठेवींद्वारे वाढविली. शेतकरी मागतील तेवढा पैसा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. ग्रामीण भागात बँकेने वसुलीचाही उच्चांक मोडला. बँकेच्या या खास कामगिरीचे अवलोकन करण्याकरिता भारत सरकारचे सहकारमंत्री बी.एस.मूर्ती, महाराष्ट्राचे सहकारमंत्री त्र्यं.शि.उर्फ बाळासाहेब भारदे व रजिस्ट्रार एल.एन.बोंगिरवार यांनी बँकेस भेट दिली. पुढे १९६० चा सहकारी कायदा निर्माण झाल्यामुळे बँकांना काम करणे अधिक सुकर झाले. या बँकेच्या पुढील यशस्वी कारकिर्दीचे शिल्पकार म्हणून अग्रक्रमाने सहकार महर्षी डॉ.वामनराव रामकृष्ण उपाख्य अण्णासाहेब कोरपे व राज्याचे माजी सहकार व कृषि राज्यमंत्री मा.निळकंठ श्रीधरराव उर्फ नानासाहेब सपकाळ तथा मा. डॉ. संतोषकुमार वा. कोरपे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

बँकेचा सुवर्ण काळ

महाराष्ट्र राज्याच्या सहकारी कायद्या नंतर १९६६ पासून बँकिंग रेग्युलेशन ॲक्टचे नियंत्रणात सहकारी बँका आल्यात व या बँकेचा सुवर्ण काळ सुरू झाला. १९६५ साली मा. डॉ. वा. रा. कोरपे हे अध्यक्षपदी निवडून आले तर तत्कालीन आमदार मा. रामरावजी झनक हे उपाध्यक्ष झाले. मा. डॉ. वा. रा. कोरपे यांची धडाडी व अविश्रांत श्रम घेण्याच्या तयारीमुळे सहकारी चळवळीस मिळालेली गती आणखी वाढली. बँकेच्या शाखा ११२ पर्यंत गेल्या. पुनर्वसनातून बँक बाहेर काढण्यात डॉ. अण्णासाहेब कोरपे यांच्या अहोरात्र प्रयत्नांना यश आहे. कर्जव्यवहार आणि ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाली. भुमिपुत्रांची बँक खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांच्या नेतृत्वात सेवारत झाली. हाच काळ बँकेच्या सर्वंकष प्रगती करिता सुवर्ण काळ ठरला.

१९९३ मध्ये मा. डॉ. संतोषकुमार कोरपे यांचे नेतृत्व बँकेस लाभले. १९९३-२००३ या दहा वर्षांचे काळात बँकेने राज्यात आपला वेगळा ठसा उमटविला. या काळात सलग तिन वर्षे सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक, असा गौरव प्राप्त झाला. खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात एक सक्षम संस्था म्हणून जिल्हा बँक पुढे आली ती याच काळात. सर्वोत्तम व्यवस्थापन, प्रशासन, योग्य नियोजन यामुळे संस्था सतत प्रगती पथावर राहिली.

२००३ ते २००७ पर्यंत मा. रमेशराव श्री. हिंगणकर यांचे नेतृत्वात संस्थेच्या भरारीचे सातत्य टिकून राहिले. विविध नव्या योजना, शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय, कमीत कमी कर्जाचा व्याजदर ठेवण्याचा कसोशीचे प्रयत्न बँकेचे अध्यक्ष मा. रमेशराव हिंगणकर व संचालक मंडळ यांनी केला.

ऑगस्ट २००७ मध्ये बँक संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यानंतर डॉ. सुभाषचंद्र कोरपे यांच्या हातात बँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे आली त्यांनी अकोला, वाशिम जिल्हयातील प्राथमिक सहकारी संस्था सक्षम करण्यास प्रथम प्राधान्य दिले. अकोला, वाशिम जिल्हयातील महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यास सुलभता यावी याकरिता संपूर्ण जिल्हा दौरा करून अकोला व वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण १३ तालुक्यात महिला सदस्यांपर्यंत बचत गटाच्या योजना पोहोचवून महिला सक्षमीकरणास मोठा हातभार लावला. अकोला, वाशिम जिल्ह्यातील सर्व शाखांचे दूरध्वनी नेटवर्क तयार करून सर्व शाखांना मुख्य कार्यालयाशी जोडण्यात आले. बचत गटांना उद्योग गट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे पहिले पाऊल म्हणून गटांना रॉकेलचे परवाने मिळवून देण्याचे यशस्वी प्रयत्न केले. बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत बायोमॅट्रीक ए. टी. एम. ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बायोमॅट्रीक ए. टी. एम. मुळे ग्रामीण भागातील निरक्षर खातेदारास आपले बोटाचा ठसा लावून रक्कम काढण्याची सुविधा मिळाल्यामुळे तांत्रीक क्लिष्टता कमी झाली व सुरक्षितता वाढली.

मा. डॉ. संतोषकुमार कोरपे हयांचे मार्गदर्शन बँकेच्या संचालक मंडळास सतत लाभलेले आहे. बँकेचे आर्थिक मानदंड व नियोजन, आधुनिकिकरण, बँकेचा व्यावसायीक दृष्टीकोण अशा अनेक बाबींमध्ये डॉ.संतोषकुमार कोरपे यांची मौलीक मार्गदर्शकाची भुमिका राहीलेली आहे. दि. १४.०७.२००९ मध्ये पुन्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा मा.डॉ.संतोषकुमार कोरपे यांचेकडे आल्यावर तर त्यांनी या बाबींना आयाम देण्यास सुरवात केली. अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर माहे ऑगस्ट २००९ मध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीसह संगणकीकरणाचा आराखडा तयार करून नियोजनबध्द अंमलबजावणी केली व माहे फेब्रुवारी २०१० मध्ये हे काम पूर्ण करून मार्च २०१० पासून बँकेच्या ५४ शाखा कोअर बँकिंगसह संगणकीकृत करण्यात आल्या. उर्वरीत शाखांचे संगणकिकरण करून १००% शाखांच्या कोअर बँकिंगच्या वाटचालीस लगेच प्रारंभ केला. बँकेच्या संपूर्ण ११२ शाखा विस्तारकक्षासह कोअर बँकींगसह संगणकीकृत केल्या आहेत. तसेच बँकेकडून एन. ई. एफ. टी व आर. टी. जी. एस., रूपे के. सी. सी. डेबीट कार्डद्वारे कर्ज वितरण, रूपे ए. टी. एम. कम डेबिट कार्ड, डिजिटल बँकिंग अंतर्गत मोबाईल बँकिंग, यु. पी. आय., आय. एम. पी. एस., क्यु. आर. कोड, बी. बी. पी. एस. पेमेंट गेटवे सर्व्हीस, पी. एफ. एम. एस., एम. एम. एस., सी. टी. एस., एस. एम. एस., मिस्डकॉल अलर्ट, बॅलन्स इन्क्वॉयरी, ग्रिन पीन इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

ग्राहकांना आधुनिक सुविधा मिळणेसाठी बँकेपर्यंत येण्याची गरज नसून ग्राहक सेवा केंद्राचे माध्यमातून मायक्रो एटीएम द्वारे बँकिंग सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

या सोबतच माहिती तंत्रज्ञान आणि माहिती सुरक्षा बाबत विविध सुक्ष्म उपाय योजनांची अंमलबजावणी याकरीता डेटा सेंटर येथील क्रिटिकल सर्व्हर्स/ नेटवर्क डिव्हाईसेसच्या निगराणीसाठी सायबर सिक्युरिटी सेंटर (C-SOC), डिझास्टर रिकव्हरी साईट, सी.सी.टी.व्ही., एटीएम सुरक्षेतंर्गत जगभरात ए. टी. एम. करिता विशिष्ट मापदंड असणारी EMV (EuroPay, Master Card, Visa) प्रणालीवर बँकेचे सर्व ए. टी. एम. कार्यान्वित करणारी जिल्हा मध्यवर्ती बँक श्रेणीमध्ये देशातील पहिली बँक असले बाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी आपले बँकेला गौरवान्वित केलेले आहे.

शाखा विस्तार

१९७२ साली महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू केली व कापसाचे चुकारे जिल्हा सहकारी बँके मार्फतच करण्यात आले. त्यामुळे लोकांच्या सोयी करिता जिल्हा सहकारी बँकेचा खालील प्रमाणे शाखा विस्तार झाला.

  • १९०९ ते १९३० - २ शाखा
  • १९३० ते १९७० - २५ शाखा
  • १९७० ते १९८० - २५ शाखा
  • १९८१ ते १९९० - ५० शाखा
  • १९९१ ते २००० - ११ शाखा
  • २००१ ते २०१२ - ३ शाखा (पैकी २ विस्तारपटल)
  • २०१२ ते २०१३ - १ शाखा (पैकी १ विस्तार पटल)
  • २०१३ ते २०१४ - १ शाखा
  • २०१४ ते २०१५ - १ शाखा (पैकी १ विस्तार पटल)
  • २०१५ ते २०१६ - २ शाखा (पैकी १ विस्तार पटल)
  • २०१६ ते २०१७ २ शाखा

एकुण शाखा विस्तार ११९ शाखां पर्यंत झाला. त्यापैकी ८ शाखा सक्षम नसल्यामुळे बंद करण्यात आल्या व ३ शाखांचे विलीनीकरण करण्यात आले. आज रोजी बँकेच्या १०७ शाखा व ५ विस्तार कक्ष कार्यरत आहेत.